- वॅगनआर झाडावर आदळून चालकाचा जागीच मृत्यू
रामनगर / वार्ताहर
रामनगर–धारवाड रस्त्यावरील मुंडवाडा क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात वॅगनआर कार झाडावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील दोघे गंभीर जखमी झाले.
गोवा पणजी येथून अळणावरकडे निघालेली वॅगनआर कार (क्रमांक GA 05 BZ 323) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या अपघातात चालक अब्दुल (वय ५५, रा. पणजी, गोवा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमध्ये समोर बसलेले दादू कौसर (वय ३०) आणि मागे बसलेली हीना कौसर (वय ३९, दोघेही रा. पणजी, गोवा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने रामनगर येथे प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारांसाठी त्यांना बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर सरकारी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








