• अपघातात युवक गंभीर जखमी
  • खानापूर – बेळगाव महामार्गावरील घटना

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर–बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर गणेबैल नजीक हतरगुंजी क्रॉस येथे आज बुधवारी (ता. 17) रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हतरगुंजीहून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराची बेळगावहून खानापूरकडे जाणाऱ्या मालवाहू अशोक लेलँड वाहनाशी समोरासमोर धडक झाल्याने ही घटना घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव वामन पांडुरंग घाडी (वय 24 वर्षे रा. झाड नावगा, ता. खानापूर) असे आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वामन घाडी हा आपल्या दुचाकीवर (क्र. केए 22 एचटी 8411) हतरगुंजीकडून विरुद्ध दिशेने जात असताना बेळगावहून खानापूरकडे येणाऱ्या अशोक लेलँड मालवाहू रिक्षा वाहनाला (क्र. केए 22 डी 6942) जोराची समोरासमोर धडक बसली. या अपघातात वामन घाडी याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तात्काळ खानापूर पोलीस व रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमी वामन घाडी याला रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वामन घाडी हा फरशी फिटिंगचे काम करीत असल्याची माहिती आहे.

खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.