खानापूर / प्रतिनिधी
बुधवारपासून सुरू झालेला गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था रहावी, यासाठी खानापूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी शहरात पथसंचलन केले.
खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गवंडी यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले. यावेळी खानापूर, नंदगड तसेच राखीव पोलीस दलाची तुकडी या पथसंचलनात सहभागी झाली होती. शहरात गणपतीच्या पार्श्वभूमीवर शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे शिवस्मारक ते पारिश्व़ाड क्रॉसपर्यंत संपूर्ण बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. अशातच पोलिसांनी पथसंचलन केल्याने खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. पोलीस स्थानकापासून सुरू झालेले पथसंचलन शिवस्मारक, स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बेंद्रे खुट्ट, बाजारपेठ, पारिश्वाड क्रॉस येथून जांबोटी क्रॉस ते बेळगाव-खानापूर महामार्गावर पथसंचलन करण्यात आले.

