बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये सोमवारी लष्कर-नागरी समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी स्टेशन कमांडर तसेच मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी होते. बैठकीला बेळगाव येथील राज्य आणि केंद्रीय सेवेतील विविध सुरक्षा व आपत्ती निवारण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यात वायुसेने प्रशिक्षण विद्यालय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), इंडियन रिझर्व्ह बटालियन कर्नाटक, केंद्रीय राखीव पोलिस दलची (सीआरपीएफ) कोब्रा फोर्स तसेच इंडो तिबेट सीमा दलाच्या (आयटीबीपी) काउंटर इन्सर्जन्सी जंगल वॉरफेअर स्कूलचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले. बैठकीत सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रम, परस्पर पायाभूत सुविधा वापर, तसेच उत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण यावर चर्चा झाली.