बेंगळुरू : बालविवाह ही एक सामाजिक समस्या आहे जी मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे. बालविवाह रोखण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे आणि यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बुधवारी, पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, चिक्कनायकनहल्लीचे आमदार सुरेश बाबू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, काही समुदाय आणि जमातींमध्ये प्रचलित असलेल्या सामाजिक रीतिरिवाजांमुळे बालविवाह होत आहेत. ज्यामुळे बालगर्भधारणेचे प्रमाण वाढत आहेत. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने आधीच एक कायदा लागू केला आहे. आमच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अखत्यारीत बाल संरक्षण समिती कार्यरत आहे आणि बेंगळुरूमध्ये ४ केंद्रे आणि प्रत्येक जिल्हा केंद्रात एक केंद्र कार्यरत आहे, असे मंत्री महोदयांनी सांगितले.
बालविवाह रोखण्यासाठी सोशल मीडियावर नियंत्रण ठेवायला हवे असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग, समाजकल्याण विभाग, महसूल विभाग, अनुसूचित जाती आणि जमाती विभाग एकत्रितपणे काम करतील. मुलांच्या सुरक्षेसाठी चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ देखील २४ तास कार्यरत आहे. संकटात असलेल्या मुलांबद्दल जेव्हा फोन येईल तेव्हा संबंधित अधिकारी मुलाच्या संरक्षणासाठी त्वरित कारवाई करतील, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, ग्रामपंचायतपासून जिल्हा पातळीपर्यंत महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी महिला आणि बाल हक्क देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच महिला पोलिसांचा समावेश असलेले अक्का दल स्थापन केले जाईल असे उत्तर मंत्री यांनी दिले.