चिक्कोडी / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील मुगळी गावात माजी तालुका पंचायत सदस्य आणि काँग्रेसच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

माजी तालुका पंचायत सदस्य आणि काँग्रेस नेते राजू पाटील यांच्यावर मिरची पावडर फेकून जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुगळी गावातील बस स्टँडजवळ रात्रीच्या वेळी त्यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर पळून गेले आहेत. राजू पाटील यांच्या बोटांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चिक्कोडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुगळी गावातील मुख्याध्यापक आणि त्यांच्या मुलाने वैयक्तिक वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे. याप्रकरणी चिक्कोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.