खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील शिरोली विभाग सी.आर.पी मधील हेम्मडगा, जामगाव, डोंगरगाव, गवाळी, आबनाळी, पाली, कोंगळे, मेंडील, नेरसे, सायाचिमाळ, चापवाडा, हनबरवाडा, पास्तोली, शिरोली, शिरोलीवाडा, तेरेगाळी, गिहाळ, तिवोली या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम शिरोली मराठी प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोली शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी गावडे हे होते. तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून शिरोली विभाग सी.आर.पी. श्री बी. ए. देसाई हे होते.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून सीमाभागातील मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा वाचवणे आणि त्या शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, या प्रयत्नाचा भाग म्हणून युवा समितीच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून आणि दुर्गम भागातील इतर विद्यार्थ्यांना मदत म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते असे सांगितले. दुर्गम भागात दळणवळण आणि इतर साधनव्यवस्था नसताना या भागातील शिक्षक आपली सेवा बजावत असून त्यांच्या कार्याचे कौतुक होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली आणि यावर्षी सुद्धा जवळपास तीनशे शाळा आणि ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येणार आहे असे सांगितले. यावेळी युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष गुंडू कदम, खानापूर समिती कार्यकर्ते विक्रम देसाई, तसेच रमेश कवळेकर, पद्माकर गावडे, किशोर शितोळे, संदीप मदभावे, शामराव जाधव, सी. एलमक्कनावर, विनोद देसाई, मारुती चव्हाण, सुनील मादार, करविनकोप्प आदी शिक्षक उपस्थित होते. प्रशांत वंदुरेपाटील यांनी सूत्रसंचालन केले.