- ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
बेळगाव / प्रतिनिधी
बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या लक्ष्मी टेक रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामपंचायतीला नियमित कर भरूनही कचरा उचलला जात नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेनकनहळ्ळीतील लक्ष्मी टेक रोडवर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आम्ही ग्रामपंचायतीला नियमितपणे कर भरतो, तरीही कचरा उचलला जात नाही. यामुळे येथे चालणेही मुश्कील झाले आहे, अशी तक्रार येथील स्थानिक रहिवासी करत आहेत. कचऱ्याच्या वाढत्या ढिगाऱ्यांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था करण्यासोबतच, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही कचरा उघड्यावर न टाकता योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन, नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.