- नेरसा येथे कारवाई : आरोपींची हिंडलगा कारागृहात रवानगी
खानापूर / प्रतिनिधी
नेरसा (ता. खानापूर) येथे भीमगड अभयारण्यात सांबरची शिकार करून मांस वाटून घेत असताना वनाधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी धाड घालून ९ जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून ३५ किलो सांबरचे मांस, शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या बंदुका आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती वनाधिकारी श्रीकांत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.
भीमगड अभयारण्याच्या वनविभागात नेरसा येथील जंगलात सांबरची शिकार करून मांस वाटून घेण्यात येत असल्याची माहिती बेळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. बेळगाव विभागाचे सीसीएफ मंजुनाथ चव्हाण यांच्या पथकाने उपवनाधिकारी क्रिष्टा मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली नेरसा येथे धाड टाकून 9 जणांना ताब्यात घेतले. जंगलात शिकार करून सर्व्हेनंबर १०४ या शेतवडीत मांस वाटून घेण्यात येत होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून खानापूर न्यायालयासमोर हजर केले.
शिकारीप्रकरणी रणजीत देसाई, बळवंत देसाई, आत्माराम देवळी, प्रमोद देसाई, दत्तराज हवालदार, ज्ञानेश गावडे, गोविंद देसाई, अप्पी हणबर, बाराप्पा हणबर या 9 जणांना अटक करून वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कलम ९, ३९, ४४, ५०, ५१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता निंबरगी, श्रीकांत पाटील, भीमगड अभयारण्य वनाधिकारी सय्यदसाब नदाफ, वाय. एस. पाटील, लोंढा विभागाचे वनाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.