- ११ जणांवर गुन्हा ; चौघांना अटक
- निनावी पत्रामुळे घोटाळा उघडकीस
बागलकोट : जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात पंतप्रधान फसल विमा योजनेच्या नावाखाली तब्बल ३० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे आणि फोटो वापरून सरकारची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा उलगडा एका निनावी पत्रामुळे झाला. आपली ओळख गुप्त ठेवत संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार प्रशासन सतर्क झाले आणि सखोल चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. २०२०-२१ पासून शेतकऱ्यांच्या नावाने बनावट फोटो तयार करून, प्रत्यक्षात पीक नसतानाही विमा रक्कम काढण्यात आली. या मार्गाने सुमारे ३०,२८,५१,५८० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी मुधोळ कृषी विभागाचे सहायक संचालक सिद्धलिंगेश दोडामणी यांनी तक्रार दाखल केली असून, मेटागुड्डा गावातील सात जणांसह युनिव्हर्सल सोमपू विमा कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, विमा कंपनीचे कर्मचारी यशवंत, राकेश, प्रकाश आणि अनिल यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घोटाळ्यात काही सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनेचा गैरवापर करून कोट्यवधींची लूट केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.








