बेंगळूर : बारावी (पीयूसी द्वितीय वर्ष) परीक्षेचा निकाल आज गुरुवार दि. ९ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी पदवीपूर्व शिक्षण विभाग आणि मंत्री मधु बंगारप्पा यांची पत्रकार परिषद होणार असून, त्यानंतर अधिकृतपणे निकाल प्रसिद्ध केला जाईल.

विद्यार्थ्यांना आपला निकाल www.karresults.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या तारखेची उत्सुकता होती. ७ किंवा ८ एप्रिल रोजी निकाल लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र कर्नाटकात सुरू असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमुळे निकाल जाहीर करण्यात विलंब झाला.

तसेच आगामी पुरवणी परीक्षांचे नियोजन लक्षात घेऊन गुरुवार दि. ९ रोजी निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली आहे.