बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा मराठा व मराठीप्रेमी कार्यकर्त्यांकडून गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रकाश मरगाळे यांनी बेळगावातील मराठी पत्रकारांनी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, तो लवकर निकाली निघावा यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाला मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते रमाकांत कोंडुसकर, संजय सातेरी, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, सागर पाटील, विजय भोसले, प्रशांत भातकांडे, कपील भोसले, संजय भाकोजी, बाळू जोशी, मनोहर सांबरेकर, राजेंद्र बिर्जे, संदीप हादगल आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








