कोल्हापूर / प्रतिनिधी
श्री क्षेत्र जोतिबा येथे ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार, ३० मार्च) पासून डोंगरावर अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मालवाहू ट्रक, मोठी वाहने, तीनचाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना केर्ली, कुशिरे, वाघबीळ आणि गिरोली या नाकाबंदी ठिकाणांपुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ही वाहतूक व्यवस्था पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार लागू करण्यात आली असून, एकेरी वाहतूक आणि प्रवेशबंदीचे नियम १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
१ एप्रिल रोजी मुख्य यात्रेनिमित्त सकाळी ५ वाजल्यापासून दुचाकी वाहनांनाही डोंगरावर प्रवेश दिला जाणार नाही. दानेवाडी क्रॉसिंग, जुने आंब्याचे झाड आणि गिरोली फाटा येथून दुचाकींना प्रवेश बंद असेल. भाविकांनी पार्किंग ठिकाणांहून मोफत एसटी किंवा केएमटी बससेवेचा वापर करावा. दरम्यान, डोंगर ते जुने आंब्याचे झाड या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहील.
दर्शन करून परतणाऱ्या भाविकांनी गिरोली मार्ग, तसेच जुने आंब्याचे झाड–गायमुख–केर्ली किंवा दानेवाडी–वाघबीळ मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी दुपारी ४ नंतर केर्ली फाटा, गिरोली टी-पॉइंट आणि इतर सर्व मार्गांवरून डोंगराकडे सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णतः बंदी राहणार आहे.
पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी दुपारी ४ वाजण्यापूर्वी डोंगरावर पोहोचावे. केली ते जुने आंब्याचे झाड, दानेवाडी क्रॉसिंग, रेस्ट हाऊस, सेंट्रल प्लाझा, यमाई टोल नाका, गिरोली फाटा ते निलगिरी बाग या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहन उभे करण्यास किंवा पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वाहन पार्किंगसाठी प्रशासनाने विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. सेंट्रल प्लाझा येथे ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर आणि इतर मोठ्या वाहनांसाठी जागा राखीव आहे. गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी यमाई वळण, बुने कॉर्नर, श्रावणी हॉटेल परिसर, केएमटी थांबा, निलगिरी बाग, दोनवाडी फाटा आणि बुने येथे सुविधा उपलब्ध आहे.
तसेच केर्ली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी जुने एसटी स्टँडसमोर, पिराचा कडा, तोरणाई कडा, नवीन एसटी स्टँडमागील जागा, जुने आंब्याचे झाड आणि गायमुख इनाम पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे.








