रायबाग / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्याच्या मेखळी गावात रस्ता अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी परतत असताना कारची धडक बसून झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कोटरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मेखळी गावातील रहिवासी जनश्री कोटरे (वय ११ वर्ष) आणि भाग्यश्री कोटरे (वय १३ वर्ष) या दोन बहिणी पाच दिवसांपूर्वी शाळेतून पायी घरी जात होत्या. या दरम्यान एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात लहान बहीण जनश्रीचा जागीच मृत्यू झाला, तर मोठी बहीण भाग्यश्री बेळगावमधील रुग्णालयात उपचार घेत होती.
पाच दिवसांच्या उपचारानंतर आज भाग्यश्रीचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील दोन्ही मुली गमावल्याने आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. सदर अपघात कार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कार चालकाविरुद्ध वेगाने तपास सुरू आहे. भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता जोर धरत आहे.








