- सीसीटीव्ही व वेबकास्टिंगची व्यवस्था
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आज, बुधवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून शिक्षण विभागाने यासाठी व्यापक तयारी केली आहे. परीक्षा शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा संपताच दहावीच्या परीक्षांचा प्रारंभ होत असून १८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत.
यंदा जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ६६७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. पहिल्याच दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर होणार असून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची परीक्षा होईल. परीक्षेसाठी १०४ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच जिल्हा पंचायत आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून वेबकास्टिंगद्वारे सतत देखरेख ठेवली जाणार आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी काटेकोर नियोजन केले असून कोणत्याही केंद्रावर त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. निकालात सुधारणा व्हावी यासाठी वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले होते. या प्रयत्नांचे फलित परीक्षेनंतर स्पष्ट होणार असले तरी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.








