- १३१ केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगची नजर
- २८ भरारी पथके तैनात
चिक्कोडी / वार्ताहर
२०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावीच्या परीक्षेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक सीताराम आर. एस. यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील २४० सरकारी, १५२ अनुदानित आणि २२९ विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील एकूण ४५,५९८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. यामध्ये २४,१०० मुलगे आणि २१,४९८ मुलींचा समावेश आहे. परीक्षेसाठी १३१ केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यात ३९ क्लस्टर आणि ९२ नॉन-क्लस्टर केंद्रांचा समावेश आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगची व्यवस्था करून पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला आहे.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर ४ आणि तालुका स्तरावर २४ अशी एकूण २८ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर मुख्य अधीक्षक, अभिरक्षक आणि मोबाईल स्वाधीन अधिकारी तैनात असणार आहेत. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ४८ मार्ग निश्चित करण्यात आले असून २,१३४ परीक्षा खोल्यांवर देखरेख ठेवली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला डायटचे प्राचार्य संजू हुल्लोळी, नोडल अधिकारी हरिदास खाडे आणि राजू देवरुषी उपस्थित होते.








