- आयसीयूमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत अनेक जखमी
- चौकशीचे आदेश
कटक : ओडिशा राज्यातील कटक येथे असलेल्या एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला मध्यरात्री भीषण आग लागून १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयू विभागात आग लागल्याने रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत पाच रुग्ण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयाच्या दुसऱ्या इमारतीत उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आयसीयू विभागातून धूर आणि ज्वाळा बाहेर येऊ लागल्याने कर्मचारी व रुग्णांमध्ये घबराट पसरली. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या काही रुग्णांचा धूर गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.








