• गर्लगुंजी गावावर शोककळा

खानापूर / प्रतिनिधी

रंगपंचमीच्या उत्सवी वातावरणात खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्राजवळ दुर्दैवी घटना घडली. मित्रांसोबत सण साजरा करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सणाचा आनंद क्षणात विरून गेला.

गर्लगुंजी येथील संतोष सातेरी बिर्जे (वय २४) हा तरुण रंगपंचमी निमित्त मित्रांसोबत खानापूरजवळील मलप्रभा नदी पात्राच्या परिसरात आला होता. सणाच्या उत्साहात मित्रमंडळी नदीकाठी आनंद साजरा करत असताना संतोष पोहण्यासाठी नदीत उतरला. मात्र काही वेळातच तो पाण्यात दिसेनासा झाला. सुमारे पाच मिनिटे उलटूनही संतोष वर न आल्याने त्याच्या मित्रांमध्ये भिती निर्माण झाली. त्यांनी तातडीने गावातील नागरिकांना माहिती दिली. यानंतर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. नदीच्या पात्रात शोधमोहीम राबविण्यात आली असून अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर संतोषचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

संतोष बिर्जे हा मशरूम शेतीचा व्यवसाय करत होता. तो गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे सेक्रेटरी सातेरी बिर्जे यांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गर्लगुंजी गावात शोककळा पसरली असून रंगपंचमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने सणाचा उत्साह मावळल्याचे चित्र दिसून येत आहे.