• शिवानंद महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा
  • मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे आयोजन

कागवाड : साहित्य म्हणजे वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. सुखाचा त्याग, दुःखाचा भोग, विसंगतीचा योग खऱ्या प्रतिभेला जाग आणत असतात. माणसाला दुःख अटळ आहे. ते कुणालाही चुकलेले नाही. परंतु त्या दुःखाला केवळ कवटाळून बसण्याला काही अर्थ नाही. सुखाचा त्याग आणि दुःखाचा भोग ही कोणत्याही प्रतिभेची प्रेरणा ठरायला हवी. मराठी भाषा गौरव दिवस हा प्रतिभा जागवायचा दिवस आहे. कुसुमाग्रजानी ज्या अंतप्रेरणेने प्रगल्भ असे साहित्य लिहून मराठी भाषेची सेवा केली; तशी आजच्या पिढीने, विद्यार्थ्याने लिहिले पाहिजे. सगळे पुन्हा मिळू शकेल पण वेळ गेलेली कधीच पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही चांगले वाचा, चांगले लिहा. हे काम इथल्या मराठी विभागात होतं आहे याचे मला प्रचंड समाधान वाटते आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विनोद गायकवाड बोलत होते.

बोलताना पुढे डॉ. गायकवाड म्हणाले, तारुण्याचा काळ हा फार महत्वाचा आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणायचे सगळ्यात विषेश काळ आयुष्यातला कोणता तर तो तारुण्याचा काळ असतो. तो काळ तरुणांकडे असतो पण दुर्दैवाने ते त्यांनाच माहीत नसते. शिरवाडकर यांनी अशा तारुण्यात कितीतरी कविता लिहिल्या. विनायक सावरकरांनी याच वयेत मराठीला असंख्य नवीन शब्द देऊन मराठी भाषेची समृध्दी वाढविली. असे काहीतरी आपल्याला करता आले पाहिजे. बहिणाबाई चौधरी तर निरक्षर असतानाही किती प्रतिभावान काव्य लेखन त्यांनी केलं. चांगलं वाचलं की चांगलं लिहिता येते. रोजची वर्तमानपत्रे मासिके वाचा. तूम्ही समृध्द व्हाल. असे ते म्हणाले.

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सभामांचावर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर गोंधळी, महाविद्यालयातील गुणवत्ता मानांकन केंद्राचे समन्वय अधिकारी प्रा. बी. डी. दामन्नवर, मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. मनोज कोरे आदी उपस्थित होते.

डॉ. एस. पी. तळवार यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कोणतीही भाषा माणूस जोडण्याचे काम करते. भाषेच्या विकासात साहित्यिक योगदान देत असतात. शिरवाडकर यांनी मराठी भाषेला फार मोठे योगदान दिले आहे. डॉ. गायकवाड यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी आपला सृजनात्मक आविष्कार साहित्य लेखनातून करावा.

उपस्थितांचे स्वागत प्रा. मनोज कोरे यांनी केले तर प्रास्ताविक आणि परिचय प्रा. अशोक आलगोंडी यांनी करून दिला. यावेळी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कविता लेखन, निबंध लेखन व पोस्टर बनवणे स्पर्धा घेतल्या होत्या. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु शुभम बोरगावे, व्दितीय क्रमांक श्वेता बाबर, तृतीय क्रमांक अनन्या कुलकर्णी आणि उत्तेजनार्थ प्रतीक्षा पाटील, अश्विनी माळी, प्रीती मुळीक यांना मिळाला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम स्नेहा करव, व्दितीय वैष्णवी माळी, तृतीय महेक अपराज आणि उत्तेजनार्थ पूजा भगत, निर्जरा पाटील, अक्काताई पाटील यांना मिळाले. पोस्टर बनवणे स्पर्धेत प्रथम सानिया गायकवाड, व्दितीय माधुरी माने, तृतीय शुभम बोरगावे आणि उत्तेजनार्थ वैष्णवी माळी, साक्षी पाटील, स्नेहल पाटील यांनी मिळवले.

यावेळी डॉ. अमोल पाटील, प्रा. साजिद इनामदार, प्रा. शिवानंद आवटी, प्रा. अशोक पाटील, प्रा. सोनाली फडतरे, मराठी पत्रकार संघाचे पत्रकार लक्ष्मण सुर्यवंशी, सचिन माने, अरुण जोशी आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु शुभम बोरगावे व सानिया बिलगी यांनी केले तर आभार गणित विषयाच्या प्रा. जास्मिन राजापूरे यांनी केले.