- ७ मार्चला पुढील सुनावणी ; बचाव-सरकारी पक्षाचा युक्तिवाद होणार
बेळगाव : येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक प्रकरणातील खटला क्रमांक १२६ ची बुधवारी द्वितीय जेएमएफसी न्यायालय येथे सुनावणी झाली. यावेळी २४ पैकी १९ संशयित न्यायालयात हजर राहिल्याने त्यांचे जबाब नोंदविण्यात आले.
फलक हटविल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण पोलीस यांनी एकूण सात गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी पाच खटल्यांची सुनावणी पूर्ण होऊन संबंधितांची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर उर्वरित दोन खटल्यांची सुनावणी सुरू आहे.
खटला क्रमांक १२६ मध्ये २४ जणांविरोधात कारवाई सुरू होती. मात्र वारंवार गैरहजर राहिल्याने पाच जणांची नावे वगळण्यात आली असून सध्या १९ जणांविरोधात खटला चालू आहे. बुधवारी हजर राहिलेल्या सर्व १९ जणांचे जबाब नोंदविण्यात आले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार असून त्यावेळी बचाव पक्ष व सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला जाणार आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. शाम पाटील आणि ॲड. हेमराज बेंचण्णावर काम पाहत आहेत.







