बैलहोंगल / वार्ताहर
बैलहोंगल तालुक्यातील नयानगरजवळ मलप्रभा नदीपात्रात तीन दुचाकी संशयास्पदरीत्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या या गाड्या पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नदीपात्रात दुचाकी दिसत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ बैलहोंगल पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही गाड्या पाण्याबाहेर काढल्या. प्राथमिक चौकशीत या दुचाकी चोरीच्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चोरट्यांनी गाड्यांचा गैरवापर केल्यानंतर पकड टाळण्यासाठी त्या नदीत फेकल्याचा अंदाज आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी दोन दुचाकींवर KA-25-G-1459 आणि KA-24-J-7907 असे क्रमांक आढळले, तर तिसऱ्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. यावरून संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.
पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, होंडा शाईन, अपाची आणि स्प्लेंडर प्लस या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्या सवदत्ती येथे झालेल्या सराफी पेढीवरील दरोड्यात वापरण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुन्ह्यानंतर आरोपींनी ओळख पटू नये म्हणून या गाड्या नदीत फेकून दिल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून दुचाकींचे मूळ मालक आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.








