• तीन दिवसांचा यात्रोत्सव , भाविकांसाठी विशेष बससेवा

दड्डी : सीमाभागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहनगा दड्डी येथील श्री भावेश्वरी देवी यात्रोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवसपूर्तीसाठी सीमावर्ती भागासह विविध ठिकाणांहून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात दड्डीजवळ असलेल्या मोहनगा येथे दि. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान हा यात्रोत्सव साजरा होत आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

आज मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून, महानैवेद्य अर्पण व दंडवत घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंपरेनुसार यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा बाजारही भरवण्यात आला असून, येथे ४ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत व्यवहार सुरू आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी केएसआरटीसीकडून बेळगाव, संकेश्वर आणि गडहिंग्लज आगारातून अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, घटप्रभा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांनी मोदगा बंधाऱ्यावरूनच प्रवास करावा, तसेच प्रशासन व मंदिर समितीला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.