बेळगाव : पॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमी (PSA) ची होतकरू आणि गुणवंत जलतरणपटू ऋत्वी सचिन कंग्राळकर हिने मंगळुरू (कर्नाटक) येथे We One Aquatic Club यांच्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. गेल्या एका वर्षापासून सातत्याने सराव करणाऱ्या ऋत्वीच्या या यशामागे तिची मेहनत, शिस्तबद्ध तयारी आणि प्रशिक्षकांकडून मिळालेले अचूक तांत्रिक मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे.
ऋत्वीच्या या यशात तिच्या पालकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात त्वरित यशाच्या अपेक्षेपेक्षा प्रशिक्षकांवर विश्वास ठेवत संयमाने संपूर्ण प्रक्रिया पाळणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा सकारात्मक दृष्टिकोनातूनच मानसिकदृष्ट्या सक्षम खेळाडू घडतात. दीर्घकालीन विकासावर भर देणारी, प्रक्रिया-केंद्रित तयारी हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचा विश्वास पीएसए व्यक्त करत आहे. ऋत्वीचे हे रौप्यपदक तिच्या उज्ज्वल वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात तिच्याकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








