बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य सरकार, कर्नाटक ॲथलेटिक्स असोसिएशन बेंगलोर, युवा क्रीडा व सक्षमीकरण खाते आणि कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुमकुर येथे आयोजित राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बेळगावच्या वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, स्मिता काकतकर व नकोशा मगनाळकर या क्रीडापटूंनी अभिनंदन यश मिळविले आहे.

तुमकुर येथील महात्मा गांधी क्रीडांगणावर कालपासून येत्या गुरुवारी 22 जानेवारी 2026 पर्यंत मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगावच्या वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, स्मिता काकतकर व नकोशा मगनाळकर या धावपटूंनी 4×100 मी. रिले शर्यतीमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. याचबरोबर अपूर्वा नाईक हिने 100 मी. हर्डल्स शर्यतीत रौप्य, तर स्मिता काकतकर हिने तिहेरी उडीमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. या सर्व क्रीडापटू लिंगराज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असून त्या व्हॅक्सिन डेपो टिळकवाडी येथे क्रीडा भारती शाखेत सराव करतात. त्यांना क्रीडा प्राध्यापक रामराव यांचे प्रोत्साहन तसेच ॲथलेटिक्स प्रशिक्षक अशोक शिंत्रे, मधुकर देसाई व सुरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मिनी ऑलिम्पिक स्पर्धेतील उपरोक्त यशाबद्दल वरील चारही क्रीडापटूंचे महाविद्यालयासह क्रीडा क्षेत्रात अभिनंदन होत आहे.