• हृदयविकाराने मृत्यू भासविण्याचा प्रयत्न : मित्रांनी उघड केला हत्येचा प्रकार

चिकोडी / वार्ताहर

जन्मदात्या वडिलानेच आपल्या तरुण मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चिकोडी शहरातील इंदिरानगर येथे बुधवारी उघडकीस आली. किरण उर्फ बाळासाहेब आलुरे असे त्याचे नाव आहे. मुलाच्या व्यसनाच्या त्रासाला कंटाळून मुलाचा खून केल्याची कबुली मारेकरी वडिलांनी दिली आहे. सोमवारी घडलेली ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे. किरण उर्फ बाळासाहेब आलुरे (वय ३१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर निजगुणी आलुरे असे खून करणाऱ्या वडिलांचे नाव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तर हत्येत मदत केल्याच्या संशयाखाली हॉटेल व्यावसायिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. हत्येचे हे प्रकरण उघड करण्यात मित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सोमवारी दुपारी किरणचा मृत्यू झाल्याचे सांगून वडिलाने हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगत परिसरात तशी माहिती पसरवली होती. मात्र, किरणच्या मृत्यूबाबत त्याच्या मित्रांना संशय वाटू लागला. मृत्यूच्या परिस्थितीबाबत सुसंगत माहिती न मिळाल्याने मित्रांनी चौकशी सुरू केली. संशय वाढल्यानंतर किरणच्या मित्रांनी त्याचे वडील निजगुणी आलुरे याला जाब विचारला. यावेळी चौकशीत निजगुणी आलुरे यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून बेळगावला नेण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याने त्याला पुन्हा चिकोडीत आणून अंत्यक्रिया केली आहे. या घटनेनंतर किरणच्या मित्रांनी तात्काळ संशयिताला चिकोडी पोलीस स्थानकात हजर केले. पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणात हॉटेलमालकाचाही सहभाग असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.