खानापूर / प्रतिनिधी

नऊ हत्तींच्या कळपाने निलावडे परिसरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हातातोंडाला आलेल्या भात, कस पिकासह केळी व नारळाच्या झाडांचे आणि पाईपलाईनचे अतोनात नुकसान सुरू असून या संकटातून कसे सावरावे, याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. मंगळवारी रात्री आंबोळी येथील विष्णू पाटील, पांडुरंग गवाळकर या शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात हत्तींनी रात्रभर मुक्काम केला. या दोन्ही शेतकऱ्यांचा एक टनही ऊस शिल्लक राहिलेला नाही. बांदेकरवाडा येथील शेतकरी नारायण दळवी यांनी मळणी करून वाहतुकीसाठी ट्रॅक्टरची सोय न झाल्याने २० पोती भात शेतातच ठेवले होते. या आयत्या खाद्यावर हत्तींनी रात्रभर ताव मारला. दळवी यांना काहीच पीक शिल्लक राहिले नाही. त्यांच्या नुकसानीची दखल घेऊन तातडीने २० हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

हत्तींचा कळप ज्या शिवारातून जात आहे तेथील पाईपलाईन उध्वस्त करत आहे. केळी आणि नारळाची झाडे तर जमीनदोस्त केली जात असून निलावडे, बांदेकरवाडा, आंबोळी, मुधवडे, कोकणवाडा, कबनाळी, कांजळे आणि मळव या भागातील शेतकरी नुकसानी बरोबरच भीतीच्या सावटाखाली जगत आहे. वनक्षेत्रपाल श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक रात्रभर गस्त घालत असून हत्तींचा कळप आवरत नसल्याने सारेच हतबल झाले आहेत. भरपाईचे अर्ज ग्रा. पं. मध्ये उपलब्ध ठेवा हत्तींकडून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सुरू आहे. वनखात्याकडून भरपाई मिळवण्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. शेतकऱ्यांचे त्रास रोखण्यासाठी निलावडे ग्रामपंचायत कार्यालयात नुकसानभरपाईचे अर्ज उपलब्ध ठेवावेत. वनविभागाने तेथे कर्मचारी नेमून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी निलावडे ग्रा. पं. सदस्य विनायक मुतगेकर यांनी केली आहे.