- अथणी तालुक्याच्या सत्ती गावातील शिवारात दुर्घटना
अथणी / वार्ताहर
अथणी तालुक्यातील सत्ती गावच्या शिवारात आज दुपारी ऊस तोडणीच्या आधुनिक मशीनच्या अपघातात दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सत्ती गावच्या हद्दीतील काडगौडा पाटील यांच्या शेतात दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ऊस तोडणीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. बौराव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) आणि लक्ष्मीबाई मल्लप्पा रुद्रगौडर (वय ६५) अशी मृत महिला मजुरांची नावे असून त्या दोघीही सत्ती गावच्या रहिवासी होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आधुनिक ऊस तोडणी यंत्राद्वारे कापणी सुरू असताना कापलेला ऊस मशीनच्या मागील भागात गोळा करण्याचे काम या महिला करत होत्या. याच वेळी मशीनचा अंदाज न आल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे त्या दोघी यंत्राच्या मागील चाकाखाली अडकल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अथणी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून या दुर्घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातानंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. मेहनतीने उदरनिर्वाह करणाऱ्या दोन महिलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सत्ती गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.








