•  दावणगेरेतील कल्लेश्वर मिलमध्ये आज सायंकाळी अंत्यसंस्कार

बेंगळुरू : दावणगेरे दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार, माजी मंत्री तसेच अखिल भारत वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांचे रविवारी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. वृद्धापकाळातील आजाराने ते काही काळ त्रस्त होते. उपचारासाठी त्यांना बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. दावणगेरे येथील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांचे पार्थिव रविवारी पहाटे बेंगळुरूहून दावणगेरे येथे आणण्यात आले. घरी पूजाविधी झाल्यानंतर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत शहरातील हायस्कूल मैदानावर सार्वजनिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता हायस्कूल मैदानावरून अंतिम यात्रा निघणार असून, जुने दावणगेरे येथील बंबू बाजार रस्त्यावरील कल्लेश्वर मिलमध्ये सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कल्लेश्वर मिलमध्ये त्यांच्या पत्नी पार्वतीम्मा यांच्या समाधीजवळच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हायस्कूल मैदानावर सार्वजनिक दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून, अंत्यदर्शनानंतर सायंकाळी ४.३० वाजता अंतिम विधी पार पडतील, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.