बेळगाव / प्रतिनिधी

खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी विमानप्रवासादरम्यान प्रसंगावधान राखत एका परदेशी तरुणीचा जीव वाचवला.

गोव्याहून दिल्लीकडे प्रवास करत असताना एका परदेशी तरुणीची प्रकृती अचानक खालावली. तिची अवस्था गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांमध्ये डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. यावेळी पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी तातडीने पुढे येत आजारी तरुणीची तपासणी केली. विमानात उपलब्ध असलेल्या प्राथमिक उपचार साहित्याच्या सहाय्याने त्यांनी तब्बल दीड तास सातत्याने उपचार केले. त्यांच्या वेळेवरच्या निर्णयामुळे आणि योग्य उपचारांमुळे त्या तरुणीवरील जीवाचा धोका टळला.

या प्रसंगानंतर विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या मानवतावादी कार्याचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. सार्वजनिक जीवनासोबतच वैद्यकीय सेवेतील आपली जबाबदारीही त्यांनी जपल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.