हुबळी / वार्ताहर

अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूरजवळ शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघातात धारवाड लोकायुक्त विभागाचे पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता गदग – हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील अरेरा पुलाजवळ ही घटना घडली. गदग येथून हुबळीच्या दिशेने येत असताना सालीमठ यांची कार नियंत्रण सुटून रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या धडकेनंतर पेट्रोल टाकीला गळती होऊन ठिणगी लागल्यामुळे कारने क्षणार्धात पेट घेतला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आग इतकी भयानक होती की सालीमठ यांना कारच्या बाहेर पडण्याचा मार्गच मिळाला नाही. काही क्षणांतच संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर वाहन पूर्णपणे भस्मसात झाले आहे. त्या दिवशी ते स्वतः कार चालवत हावेरीतील लोकायुक्त कार्यालयातील कामकाजातून गदग येथे कुटुंबीयांना भेटून परतत होते. मात्र वाटेतच नियतीने घाला घातला.

अपघाताची माहिती मिळताच धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.