- अथणी तालुक्यातील घटना
अथणी / वार्ताहर
अथणी तालुक्यातील तमवशी गावात कर्जबाजारी झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कांतेश पांडू कुंभार (वय ३५ रा. तमवशी, ता. अथणी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गावाबाहेरील कुंभार बाग परिसरात गणेश मंदिराजवळील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
कांतेश गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड कर्जामुळे मानसिक तणावाखाली होता. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांसह विविध वित्तसंस्थांकडून सुमारे पंधरा लाख रुपयांचे कर्ज त्याच्या नावावर होते, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत कांतेशच्या पश्चात पत्नी व तीन कन्या असा परिवार आहे. अचानक कुटुंबाचा आधार गमावलेल्या पत्नीने मुलांच्या भवितव्यासाठी सरकारकडून मदतीची मागणी केली आहे. या प्रकरणी अथणी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.









