- न्यायाधीशांसमोरच घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे न्यायालयात खळबळ
अथणी / वार्ताहर
न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने मंगळवारी अथणी न्यायालयात गोंधळ उडाला. मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय ५०) यांच्यावर चाकूने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब चौहान (कोतनट्टी) हा हल्लेखोर असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मालमत्तेसंबंधी वादातील सुनावणीसाठी मीनाक्षी न्यायालयात आल्या होत्या. याच प्रकरणावरून आरोपी आणि पीडितेचे पूर्वीही अनेकदा वाद झाले होते. दुपारी आरोपीने मीनाक्षी यांचा कोर्ट परिसरात पाठलाग करून विळा घेत हल्ला केला. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पीडित महिला न्यायालयाच्या हॉलमध्ये धावत गेल्या, परंतु आरोपीने न्यायाधीशांसमोरच त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षित घटनेमुळे काही क्षण न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अथणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.








