- गुरु – शिष्यांच्या नृत्याविष्काराने प्रस्थापित केला अनोखा विक्रम
नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या परिसरात गोठवणारी थंडी, उणे तापमान आणि अतिउंचीची तडाखेबाज परिस्थिती झेलत कोल्हापूरच्या तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या कलाकारांनी भरतनाट्यमचे सादरीकरण करून नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरू नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी हा अद्वितीय पराक्रम साध्य केला.
या चौघींनी थंगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या तिन्ही ठिकाणी उणे ८ अंश सेल्सियस तापमानात नृत्यसाधना साकारताना एव्हरेस्टला विशेष मानवंदना दिली.
थंगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट) येथे चौघींनी गणपती स्तुती सादर करून कला–प्रवासाची सुरुवात केली. काला पत्थर (१८,२०० फूट) येथे गोठवणाऱ्या थंडीत आणि श्वास घेण्यास त्रास देणाऱ्या दुर्गम वातावरणात शिव – श्लोक सादर करण्यात आला. एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) येथे संयोगिता पाटील यांनी प्रथम ६ मिनिटांचा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला. त्यानंतर चौघींनी मिळून “भज गोविंदम्” ही मनाला स्पर्श करणारी कृष्ण वंदना तसेच मंगलम नृत्यरसिकांसाठी अर्पण केले.
या नृत्यप्रवासा दरम्यान सलग पाच दिवसांची प्रचंड बर्फवृष्टी, अत्यल्प ऑक्सिजनमुळे होणारी श्वास घेण्याची अडचण, गोठवणाऱ्या थंडीत पायातील बूट काढूनच नृत्य सादर करावी लागणारी परिस्थिती अशा अनेक अडथळ्यांवर मात करत या नृत्यांगनांनी सादरीकरणाची सलगता आणि साधना कायम ठेवली. पहिली प्रस्तुती १२,६८७ फूट उंचीवर झाली तर अंतिम प्रस्तुती तब्बल १८,२०० फूट उंचीवर पार पडली. ही जगातली पहिलीच भरतनाट्यमची सादरीकरणत्रयी मानली जात आहे.
माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी सादर झालेली ही नृत्याविष्काराची साधना केवळ एक कलात्मक कामगिरी नसून भारतीय संस्कृतीचा जागतिक शिखरावर उमटलेला अभिमानास्पद ठसा म्हणावा लागेल.








