• बैलहोंगल तालुक्यातील घटना

बैलहोंगल / वार्ताहर

कार चालकाचा ताबा सुटून कार थेट विजेच्या खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अतिक (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावात ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की,अपघाताच्यावेळी बेळगावहून बैलहोंगलच्या दिशेने निघालेल्या या कारमधून बैलहोंगल येथील चार जण प्रवास करत होते. यावेळी चिक्कबागेवाडी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट विजेच्या खांबाला धडकली, तेव्हा कारमधील दोघांनी उडी मारून जीव वाचवला. तर आणखी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तत्परतेने जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.