- द. आफ्रिकेवर मात करत भारत ‘विश्वविजेता’ !
 - महिला विश्वचषक स्पर्धेत पहिल्या जगज्जेतेपदाला गवसणी
 
मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास घडवला. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचे स्वप्न साकार केले. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टने शतकी खेळी केली केली. पण एका बाजूने अपेक्षित साथ न लाभल्याने तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारताने एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.
- शेफाली आणि स्मृती मानधानाची विक्रमी भागीदारी :
 
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. दोघींनी जबाबदारीने खेळ करत संघाला मजबूत पाया दिला. ही जोडी आणखी मोठी भागीदारी करेल असे वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत मंधानाला ४५ (५८) धावांवर माघारी पाठवले.
- चांगली सुरुवात पण मधल्या फळीत अपयश :
 
मानधना आणि शेफाली यांच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर कोणतीही फलंदाज जोडी मोठी भागीदारी करू शकली नाही. त्याचा परिणाम थेट धावफलकावर दिसून आला. स्मृती मानधानाच्या बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज २४ (३७) धावांवर बाद झाली, तर शेफाली वर्मा ८७ (७८) धावांवर माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्या फक्त २० (२९) धावा करून बाद झाल्या. अमनजोत कौरने १२ (१४) धावा केल्या. रिचा घोषने काही क्षण झळक दाखवत ३४ (२४) धावांची खेळी केली. शेवटी दीप्ती शर्मा ५८ (५८) धावा करून अखेरच्या चेंडूवर दुसऱ्या धावेसाठी धावताना धावबाद झाली. अशा प्रकारे भारताने निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावा केल्या.

भारताने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लॉरा वोल्वार्ट (कर्णधार) आणि ताजमिन ब्रिट्स ही जोडी मैदानात उतरली. दोघींनी सुरुवातीला संयमाने फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. नवव्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा स्कोर ५० च्या पुढे गेला. मात्र १० व्या षटकात संघाला पहिला धक्का बसला. अमनजोत कौरने ताजमिन ब्रिट्सला रनआउट केले. ब्रिट्सने २३ धावा केल्या. १२ व्या षटकात श्री चरणीने दुसरे यश मिळवले, त्यांनी बॉशला शून्यावर माघारी पाठवले. १८ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा स्कोर १०० च्या पुढे गेला. पण २१ व्या षटकात शेफाली वर्माने मोठी भागीदारी मोडीत काढत लुसला बाद केले. लुसने २५ धावा केल्या. २३ व्या षटकात पुन्हा शेफालीने कमाल दाखवत मरिजाने कॅपला केवळ ४ धावांवर बाद केले.
३० व्या षटकात दीप्ती शर्माने जाफ्टाला १६ धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. त्यानंतर ४० व्या षटकात दीप्तीने आणखी एक महत्त्वाचा विकेट घेतला, एनेरी डर्कसन ३५ धावांवर बाद झाली. ४२ व्या षटकात दीप्तीने भारताला सर्वात मोठे यश मिळवून दिले. तिने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्टचा शतकानंतरचा मौल्यवान विकेट घेतला. याच षटकात तिने ट्रायोनलाही बाद केले आणि विजय भारताच्या झोळीत घातला. दीप्ती शर्माने या सामन्यात तब्बल ५ विकेट घेतल्या आणि एक रनआउटही केला. तिच्या या अफलातून कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम २४६ धावांवरच गारद झाली.

        

            




