- “त्या” ४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या सुटली
- माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या इटगी गावातील ४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या अखेर सुटली आहे. माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे सरकारने शाळेला मंजुरीचा आदेश जारी केला असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी इटगी ग्रामस्थांनी शाळेच्या मागणीसाठी आंदोलन छेडले होते. त्यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांनी गावकऱ्यांच्या आंदोलनाला थेट उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधत याविषयी पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून इटगी शाळेला शासनाची मंजुरी मिळाल्याने ४२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणप्रेमी वर्गाने त्यांच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे.