• ‘कर्नाटक केसरी’ किताबावर कोरले नाव

बेळगाव / प्रतिनिधी

म्हैसूर दसऱ्यानिमित्त भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या मल्लांनी शानदार कामगिरी करत ‘कर्नाटक केसरी’चा किताब पटकावला. चांदीची गदा आणि सुवर्णपदक जिंकून परतलेल्या विजेत्याचे शहरात आगमन होताच रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. नागरिकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

पैलवान प्रेम जाधव यांनी यापूर्वी ‘सीएम कप’मध्ये सुवर्णपदक तर ‘कर्नाटक कंठीरव’ स्पर्धेत तृतीय स्थान मिळवले होते. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कामेश पाटील यांनी यंदाच्या म्हैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत ‘कर्नाटक केसरी’ किताब आणि चांदीची गदा जिंकून अभिमान व्यक्त केला. तसेच भक्ती पाटील हिने १७ वर्षांखालील गटातील सुवर्णपदकासह ‘सीएम कप’मध्ये तृतीय स्थान मिळवून उत्तम कामगिरी केली.

कुस्ती प्रशिक्षक प्रशांत पाटील यांनी सांगितले की, अनेक वर्षांनंतर बेळगावच्या मल्लांनी अशी मोठी यशस्वी झेप घेतली असून, हे प्रशिक्षकांच्या स्वप्नपूर्तीचे क्षण आहेत. आता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पालक, गावकरी आणि अन्य कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.