खानापूर / प्रतिनिधी
हंदूर गावात मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली. जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये एक होंडा तर दुसरी सुझुकी कंपनीची असून त्या सद्दाम अस्लम सय्यद यांच्या मालकीच्या होत्या. आगीचा भडका मोठा होता. सुदैवाने घराला आग लागली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र घराच्या पुढील भागाला थोडा फटका बसला आहे.
सकाळी ग्रामस्थांनी जळालेल्या गाड्यांची आणि घराच्या आंशिक जळालेल्या भागाची पाहणी केली. घटनेची माहिती समजताच सुरेश भाऊ यांनी नंदगड सीपीआय यांना तातडीने फोनद्वारे कळवले. त्यांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने नंदगड पोलिसांकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. यावेळी बसेट्टी सावकार, सुरेश भाऊ, देमान्ना बसरीकट्टी, दीपक कवठनकर तसेच हंदूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.