कागल / वार्ताहर
प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय लोकसेवा आयोग २०२५ च्या परीक्षेत देशात ५५१ क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेला युवक बिरदेव सिद्दाप्पा डोणे (रा. यमगे ; ता. कागल जि. कोल्हापूर) याचा युवा समिती सीमाभागच्यावतीने सत्कार करण्यात आला. बिरदेव याने मेंढपाळीचा व्यवसाय (सीमाभागातील विविध गावात भटकंती करत मेंढराना चारवत) करत हे यश प्राप्त केले आहे.
यासत्कार प्रसंगी प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बिरदेव ढोणे या युवकाने आपली मातृभाषा मराठीतून शिक्षण घेत एका प्रतिकूल परिस्थितीतून यशाला गवसणी घातली आहे. मंडोळी रोड येथे भटकंती करत आपल्या परिवारासह झोपडीत राहून यश गाठणे हे कौतुकास्पद आहे, याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी, असे प्रतिपादन केले.
यानंतर शुभम शेळके यांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन बिरदेवचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभम शेळके यांनी बिरदेवने गाठलेले यश जिद्द व चिकाटीच्या जोरावर संपादन केले असून प्रत्येकाने आपली जी मातृभाषा असेल त्यातून शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन केले. बिरदेवचा खडतर प्रवास पाहता हे त्याचे हे यश फक्त कौतुकास्पद नसून वाखाणण्याजोगे आहे अशा शब्दात त्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बिरदेव याने संघटनेचे आभार मानले व प्रत्येककाने आपल्या मातृभाषेत शिक्षण घेताना कुठलाही संकुचितपणा न आणता यशाची गुरुकिल्ली जाणली पाहिजे, आर्थिक परिस्थितीची काळजी न करता जिद्दीने शिक्षण घेतल पाहिजे व प्रत्येकाने निर्व्यसनी राहून समाजाला एक चांगली दिशा दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, विजय जाधव, भागोजी पाटील, अशोक घगवे, राजू पाटील, रणजीत हावळाणाचे, रमेश माळवी, सचीन दळवी, दिपक गौडवाडकर, शुभम जाधव, अभिषेक कारेकर, अशोक डोळेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.