बेळगाव / प्रतिनिधी
श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सव्यासाची गुरुकुलम यांनी संयुक्तरित्या गेले आठ दिवस आयोजित केलेल्या शिवकालीन युद्धनीती, लाठीकाठी स्वसंरक्षण व धर्म शिक्षणाच्या शिबिराची नुकतीच यशस्वीरित्या सांगता झाली.
सदर शिबिराचा सांगता समारंभ काल मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजी उद्यान येथे पार पडला. ध्वजपूजन, दीप प्रज्वलन शस्त्रपूजनासह शिवमूर्ती पूजन करून या समारंभाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे इचलकरंजीचे प्रमुख महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर बेळगाव मधील श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर, विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव, आपण देशचे संगम ककेरी, रा.स्व.संघाचे श्रीकांत कदम या हिंदुत्ववादी प्रमुखांसह राजू कणबरकर, नंदकुमार पाटील, माजी महापौर महेश नाईक, भारतीय सैन्य दलाचे शाम मडिवाळ, गागाभट्ट यांचे वंशज श्री गणेश कुलकर्णी, हिंदुत्ववादी वकील ॲड. शामसुंदर पत्तार, प्रताप यादव, कपिलेश्वर मंदिरचे अध्यक्ष राहुल कुरणे, अजित जाधव, राजू भातकांडे, विवेक पाटील, अनिल मुतकेकर, प्रसाद बाचुळकर आदी उपस्थित होते.
धर्मवीर संभाजी उद्यानातील हिंदुत्व व शौर्याचे दर्शन घडवणाऱ्या सांगता समारंभास काल सायंकाळी वरुण राजाने देखील हजेरी होती. यावेळी शिबिरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते पालकांचे पाद्यपूजन पार पडले. शेवटी कपिलेश्वर मंदिरामध्ये आरती करून या आठ दिवसाच्या बालसंस्कार शिबिराची सांगता झाली. प्रास्ताविक व स्वागत चक्रपाणी बालसंस्कार शिबिराच्या संचालिका साक्षी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अभिजीत चव्हाण यांनी केले.