बेळगाव / प्रतिनिधी
केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस व तेलाचे दर वाढवल्याच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला.

कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी शहरातील काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देणारे फलक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

याप्रसंगी कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ केल्यामुळे गरिबांच्या जीवावर बेतले आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इतर सर्व वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अबकारी कराचे दर तातडीने कमी करावेत. या दरवाढीमुळे महागाई आणि बेरोजगारी वाढणार असल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारच्या जनविरोधी कारभाराचा युवकांनी निषेध केला पाहिजे, असे सांगून कर्नाटक राज्य युवक काँग्रेसच्या सदस्यांना जनतेचे नेतृत्व करण्याचे काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आमदार आसिफ (राजू) सेठ म्हणाले की, दुर्बल घटकांना दरवाढीचा भार सहन करावा लागत असून केंद्र सरकार हे केवळ गरीब नाही तर जनतेच्या विरोधातील आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या विरोधात आंदोलन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचं सरकार सामान्य जनतेवर भार टाकत आहे. काँग्रेसने मात्र सत्तेत असो वा नसो, नेहमी जनतेच्या बाजूने उभं राहण्याचं काम केलं आहे. सध्याचं सरकार ‘कर दहशतवाद’ राबवत असून, काँग्रेस इंधन दरवाढ मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणाच नाही, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला.
या आंदोलनातयुवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष सागर दिवटगी, ग्रामीण अध्यक्ष कार्तिक पाटील, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सिद्दिक अन्कलगी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.