येळ्ळूर / वार्ताहर

१ जून रोजी १९८६ रोजी कन्नड सक्ती विरोध आंदोलनात झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.

येळ्ळूर विभाग म.  ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवारी सायंकाळी ७. ३० वा. येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी १ जून रोजी हुतात्मा दिन होणार असून यासाठी येळ्ळूर म. ए. समितीचा पाठिंबा जाहीर करण्यात आला व शेकडोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन येळ्ळूर विभाग समितीच्या पदाधिकारी, आजी- माजी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य तसेच आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य – सदस्या, गावातील निष्ठावंत नेते, युवा कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी विलास ना. घाडी अध्यक्ष येळ्ळूर विभाग म. ए. समिती, सचिव राजू उघाडे, कार्याध्यक्ष भुजंग पाटील, उपाध्यक्ष मनोहर अ. पाटील, शांताराम कुगजी, ग्रामपंचायत सदस्य परशराम परिट, शिवाजी नांदूरकर, तानाजी पाटील, चेतन हुंदरे, निखिल पाटील, यल्लाप्पा बिर्जे, मल्लापा काकतीकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.