बेळगाव / प्रतिनिधी
येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे परमेश्वरनगर, येळ्ळूर येथील तुकाराम गल्ली भागात आज शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. येळ्ळूर परमेश्वरनगर येथील प्रभाग क्र. ८ व ९ मधील तुकाराम गल्लीसह परिसरात ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी भरत मासेकर आणि पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी प्रभागाचे लोकनियुक्त प्रतिनिधी ग्रा. पं. सदस्य शशिकांत धुळजी, अरविंद पाटील आणि कल्लाप्पा मेलगे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण हटाव मोहिमेला कांही लोकांनी विरोध केला, मात्र त्यांचा विरोध डावलून ग्रामपंचायतच्या माध्यमातून बेकायदा अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यात आली.