- जिल्ह्यातील अवैध गोमांस वाहतूक गोहत्येला आळा घालण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करावा तसेच यासंदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या सातत्याने व बिनबोभाट सुरू आहे. कर्नाटक जनावरे हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयक कायदा आणि शासनाचे आदेश असतानाही, त्यांची सर्रासपणे पायमल्ली करून गोहत्या सुरू आहे. गोहत्येमुळे केवळ नुकसानच होत नाही तर हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. जिल्हा प्रशासनाने पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि इतर संबंधित विभागांना अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करावेत. जिल्ह्यातील प्रमुख केंद्रांवर पोलीस विभागाने तपासणी नाके उभारावेत. तसेच, येत्या १२ जूनपर्यंत गोमांस विक्री आणि जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्याचा आदेश जारी करावा. कायद्यानुसार गोरक्षकांना सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.