• इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा

मुंबई : भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यातच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते. याबाबत त्याची बीसीसीआयशी चर्चाही झाली होती. मात्र अखेर आज या निर्णयावर त्याने शिक्कामोर्तब करत हा निर्णय जाहीर केला आहे.

  • भावूक पोस्ट शेअर करत विराटचा कसोटी क्रिकेटला रामराम :

विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, ‘टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या प्रारुपाने माझी परीक्षा पाहिली, मला घडवले आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली.”

तसेत त्याने पुढे लिहिले की, “टीम इंडियासाठी कसोटी खेळणे हे माझ्यासाठी नेहमीच खास होते. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिले. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिले. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयाने मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.”

  • बीसीसीआयला आधीच सांगितले होते :

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, येत्या जून महिन्यात भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा पाहता बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अखेर आज त्याने १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. विराटच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.