- अथणी येथील घटना
अथणी / वार्ताहर
घरासमोरील गेटला स्पर्श करताच विजेच्या धक्क्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.अथणी शहराच्या सत्य प्रमोद नगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली. प्रवीणकुमार कडापट्टिम (वय ४१ रा. मूळचे तेरदाळ) असे या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. अथणी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. प्रवीणकुमार हे अथणी तालुक्यातील सत्ती येथील सरकारी माध्यमिक शाळेत कन्नड विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, बुधवारी लग्नाचा वाढदिवस साजरा करून ते पत्नी व मुलांसोबत घरी परतले होते. रात्री घरी पोहोचल्यानंतर घरासमोरील लोखंडी गेट उघडताना गेटमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा त्यांना जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्याने ते जागेवरच कोसळले आणि जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे कडापट्टिमठ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुण आणि कर्तव्यदक्ष शिक्षकाचा अशाप्रकारे अकाली मृत्यू झाल्याने अथणी शहर आणि शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.