विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपुर येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक प्रकाश मिर्जी यांचा मुलाने रहात्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शहरातील शिकारखाना परिसरात ही खळबळजनक घटना घडली. अशनम प्रकाश मिरजी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अशनमने आपले वडील आणि माजी नगरसेवक प्रकाश मिरजी यांच्या नावावर असलेली परवानाधारक पिस्तूल घेतली आणि बेडरूममध्ये जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. आईवडील आणि इतर घरी असताना सकाळी ११ वा. च्या सुमारास ही घटना घडली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून त्याच्या पालकांनी धावत जाऊन दरवाजा उघडून पाहिले असता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आला. तातडीने त्याला बीएलडीई रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डीवायएसपी बसवराज यलिगर, सीपीआय मल्लैया मठपती आणि एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अशनम मिर्जी हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता अशी माहिती आहे. शवविच्छेदन करून मृतदेहाचे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना असून तरुणाच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.