मुंबई / प्रतिनिधी

मेरे देश की धरती आणि भारत का रहने वाला हू अशा गीतांमधून देशभक्तीचा संदेश देणारे चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या मनोज कुमारयांनी वयाच्या ८७ वर्षी मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या.त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयासोबतही इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण केली. शहीद (१९६५) हा चित्रपट शहीद भगतसिंग यांच्यावर आधारित आहे. खरंतर, भगतसिंग यांच्या जीवनावर अनेक चित्रपट बनले आहेत आणि ही मालिका सुरूच आहे.

पण, मनोज कुमारचा ‘शहीद’ हा चित्रपट आयकॉनिक मानला जातो. मनोज कुमारच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये हा चित्रपट गणला जातो. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मनोज कुमार यांनी १९५७ मध्ये फॅशन या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश केला. उपकार (१९६७) हा चित्रपट स्वतः मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. या कल्ट क्लासिक चित्रपटात भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक दाखवण्यात आला आहे. ‘उपकार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.