- जैतनमाळ खादरवाडी परिसरातील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्याच्या जैतनमाळ खादरवाडी भागातील शेतवडीमध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी गेलेल्या लाईनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सदर घटना रविवारी सकाळी ८ वा. सुमारास घडली. राहुल पाटील (वय ३२ वर्षे ; रा. येळ्ळूर – ता. बेळगाव) असे मृत लाईनमनचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतवडीमध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी राहुल पाटील गेले होते. तेथे रीडिंग घेत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविला.
राहुल पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. ते कष्टाळू आणि प्रामाणिक होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.