• पार्क केलेल्या कारचे मोठे नुकसान
  • टोकदार सुळ्यांनी कारचा पत्रा फाडला
  • कार ६० फूट अंतरावर फरफटत नेली

सुळगा (हिं.) / वार्ताहर

उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे या परिसरात शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास हत्तीने धुडगूस घातला असून बेकिनकेरे रस्त्यालगत असलेल्या घराशेजारी पार्क केलेल्या कारचे मोठे नुकसान केले आहे. आपल्या टोकदार सुळ्यांनी पत्रा फाडून कार फरफटत नेऊन ६० फूट अंतरावर फेकून दिली. याबरोबरच पाण्याच्या टाकी, शेतवडीतील मका, ऊस, भाजीपाल्याचे मोठे नुकसान करून परिसरात मोठी दहशत निर्माण केल्याने शेतकरीवर्गांत घबराट पसरली आहे. शेतवडीत वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना हत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून हा हत्ती कर्नाटक – महाराष्ट्र सीमाहद्दीतील डोंगराळ परिसरात ठाण मांडून आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर हत्तीला सुंडीपर्यंत हुसकाविले होते. मात्र सुंडी आणि परिसरातील नागरिकांनी या हत्तीला पिकांचे नुकसान करू नये यासाठी तेथून हुसकावले. त्यामुळे सदर हत्ती पुन्हा बेकिनकेरे, उचगाव, बसुर्ते परिसरात आल्याने शुक्रवारी रात्री अक्षरश: धुमाकूळ घालून मोठे नुकसान केले आहे.

  • कारचे मोठे नुकसान

सचिन रामचंद्र पाटील हे गोव्यातून सुटीनिमित्त ते आपल्या पत्नीच्या माहेरी डॉ. निरंजन कदम यांच्या फार्महाऊसवर रात्री वास्तव्याला होते. घरासमोर पांढऱ्या रंगाची जीए 0८ एन १६८० ही मारुती सुझुकी कार पार्क केली होती. हत्तीने कारवर हल्ला चढवून समोरील व मागील काचा फोडल्या. याचबरोबर सुळ्यांनी कारचा पत्रा फाडला आणि जवळपास – ६० फूट अंतरावर काजूच्या बागेत नेऊन फेकल्याचे दिसून आले.

  • पिकामध्ये हत्तीचा धुडगूस

संभाजी धाकलू कदम, डॉ. डी. एस. कदम यांच्या शेतवडीमध्ये जवळपास दोन एकर जमिनीत स्वीट कॉर्न मका असून यामध्ये हत्तीने धुडगूस घालून संपूर्ण पिकाचे मोठे नुकसान केले आहे. याबरोबरच प्रकाश बाबू फडके, प्रभाकर बाबू फडके यांच्या शेतवडीतील ऊस, भाजीपाला, मका पिकामध्ये धुडगूस घालून मोठे नुकसान केले आहे. तसेच घराशेजारील आणि शेतवडीतील पाच हजार लिटर व एक हजार लिटर पाण्याची टाकीसुद्धा तीस ते चाळीस फुटापर्यंत नेऊन चक्काचूर केली आहे. याबरोबरच शेतवडीत पिकांना पाणी देण्यासाठी पसरलेले पाईप, विद्युतपंप याचेही हत्तीने नुकसान केले आहे.

  • वनखात्याचे अधिकारी तातडीने दाखल

हत्तीने या परिसरात घातलेल्या धुमाकुळामुळे संतप्त नागरिकांनी तातडीने वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधताच वन खात्याचे अधिकारी रमेश गरयाप्पानवर आणि त्यांचे सहकारी सकाळी आठच्या सुमाराला घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सचिन पाटील यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी आश्वासन दिले.

  • हत्तीलाही मद्य प्रिय

महिपाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या बसूर्ते, कोणेवाडी तसेच उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड या परिसरात काजूपासून मद्यार्क काढण्याच्या भट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत. सदर काढलेली काजू फेनी लहान लहान टाक्यामधून साठा करून ठेवली जाते. अशा मद्याची चटक हत्तीला फार असते, असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या टाक्यांमधील मद्यार्क प्राशन केल्याने हत्तीला नशा चढते आणि मग ते बिथरतात आणि काही दिसेल त्यावरती हल्ला करणे, शेतवडीतील पिकात धुडगूस घालणे असे प्रकार करतात. तसेच पांढरा रंग त्यांचा शत्रू असतो असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.